नुसत्या
बिबवेवाडीत नाही, तर
पुण्यात इतरत्रही हीच परिस्थिती
आहे. हा विषय खरंतर
खूप महत्त्वाचा पण तेवढाच
दुर्लक्षित आहे. त्यामुळे
फार पाल्हाळ न लावता फक्त
मुद्दे लिहित आहे.
काय दिसतं
बिबवेवाडीत?
- वाहनांची बेसुमार वाढ. १ नोव्हेंबर (पुणे बस डे) ह्या दिवशी पुण्याच्या काही भागात रस्त्यावर वाहने कमी दिसत होती पण बिबवेवाडीत मात्र दुचाकींचा समुद्र होताच.वाहनांची प्रचंड ये जा असल्यामुळे गर्दीच्या वेळी रस्ता ओलांडायला काही मिनीटं थांबायला लागतं. वाहनांच्या संख्येबरोबरच वेगही भरपूर. त्यामुळे तरुणांनाही रस्ता ओलांडणं कठीण जातं, तर ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, गरोदर स्त्रिया यांची काय अवस्था होत असेल? अपंगांनी विचारच करु नये! वैतागून काही पादचारी घाईत किंवा धावत रस्ता ओलांडतात – जे धोकादायक ठरू शकतं. ज्येष्ठांची अगतिकता तर बघितल्यावरच समजेल! ह्यामुळे अनेक ज्येष्ठ मंडळी रस्ता क्रॉस करणंच टाळू लागली आहेत.
- उलट चालवणाऱ्या (wrong side drivers) वाहनांचा सुळसुळाट. त्यामुळे रस्ता ओलांडताना चौफेर बघत आणि जीव मुठीत धरुन चालावे लागते. उलट चालवणाऱ्यांची प्रमुख ठिकाणं - भारत ज्योती बस स्टॉपसमोर, टाकळकर क्लासेससमोर, कॅनरा बॅंकेसमोर. संख्या सांगायची तर १० मिनिटांत ५० वाहने उलटी जाताना मी मोजली आहेत. वाहतुक खात्याने कृपया नॊंद घ्यावी.
- पदपथावर ठिकठिकाणी अतिक्रमण. भाजीवाले, पथारीवाले, कार ऍक्सेसरीज, दुचाकी मेकॅनिक असे अनेक. ह्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना अर्ध्या वेळेला रस्त्यावरुन चालावं लागतं. के.के. मार्केट ते बालाजी नगर चौक ह्या रस्त्यावर पादचाऱ्यांनी चालूच नये अशी 'व्यवस्था' असावी.
एक नवीन प्रकार म्हणजे शुभेच्छांचे फलक आजकाल पदपथावर पार खालपर्यंत आलेले दिसतात. महेश सोसायटी चौकातला फलक अनेकदा डोक्याला लागतो. जोशी स्वीट्ससमोरचा तर एकदा पार पायापर्यंत आला होता. - महेश सोसायटी, देनालक्ष्मी सोसायटी (आणि इतर अनेक सोसायट्या) इथे रस्त्याच्या लेव्हलचे पदपथ (?) बांधलेत त्यावर वाहनेच पार्क केलेली दिसतात.
- सिग्नलजवळ वाहनांचे झेब्रावर अतिक्रमण. उदाहरण: महेश सोसायटी, चंद्रलोक हॉस्पीटल चौक. वाहतुक पोलिस उपस्थित असतानासुद्धा झेब्रावर वाहने उभी असतात.
- रस्त्यातले दुभाजक चांगले आहेत पण जिथे छेद आहेत तिथे झेब्रा आखलेले नाहीत किंवा पुसून गेले आहेत.
- सिग्नल चालू नसतात तेंव्हा पादचाऱ्यांची अत्यंत गैरसोय होते, कारण वाह्ननं अशा वेळेला वाट्टेल तशी हाकली जातात. पादचाऱ्यांच्या सिग्नलला वाहनं चालू पडतात किंवा पोलिसही त्यांना जाऊ देतात. मग वाहनचालकांना ह्याची सवय होते आणि ते नेहमीच हे करायला लागतात.
- पादचारी सिग्नल बऱ्याच ठिकाणी चालूच नाहीत. चालू असतीलच तर रस्ता ओलांडायला पुरेसा वेळ देतच नाहीत.
- पदपथावर व सायकल ट्रॅकवर अतिक्रमण: पुष्पमंगल चौक ते उत्सव चौक इथे दोन्ही बाजूंनी चालत फिरुन बघावे. अजून काही लिहायची गरज नाही. उत्सवच्या मागेच पालिकेचे क्षेत्रीय कार्यालयही आहे!
काही कारणं
- पादचारी हा रस्त्यावरचा प्रमुख घटक आहे, असायला हवा ही जाणीव यंत्रणांमधे नाही. प्रत्येक बाबतीत वाहनांना प्राधान्य. प्रत्येक नागरिक हा 'कधीतरीच' चालक असतो, पण नेहमी पादचारी असतो हे विसरले जाते.
- पालिकेकडून अतिक्रमण हटवताना समान वागणूक नाही. भाजीवाले, पथारीवाले यांना हटवले जाते. धनदांडगे किंवा हितसंबधी बरेचदा तसेच राहतात. एकदा फेरी मारली तर पटकन कळेल कोण हितसंबंधी आहेत.
- वाह्तुक नियम न पाळणाऱ्यांना फक्त स्वत:चाच स्वार्थ दिसतो. आपल्या बेशिस्त वागणूकीमुळे दुसऱ्याला इजा होऊ शकते, एखाद्याचा जीवही जाऊ शकतो ही भावना नाही.
- दुकानदार/पथारीवाले यांची पादचाऱ्यांच्या बाबतीत बेफीकीरीची वृत्ती. म्हातारे-कोतारे, लहान मुलं जातील कशीतरी वाट काढत, आपल्याला काय त्याचं?
- पादचारी संघटित नाही, तसेच चांगला पदपथ मिळणे हा आपला अधिकार आहे ही जाणीव नाही त्यामुळे रस्त्यावरचा सर्वात दुर्लक्षित घटक बनला आहे.
काही
उपाययोजना
- वाहनचालकांनी लक्षात ठेवायला हवे की तुम्हीही कधीतरी पादचारी असताच. तुमचे आईवडिल, आजी-आजोबा, मुलं हेही चालत रस्ता ओलांडतात. दुसऱ्या कोणीही सांगायला न लागता वाहतुक नियम स्वत:च पाळावे. आपली चूक असेल आणि कोणी दाखवून दिल्यास उद्धट उत्तर देणं नक्कीच टाळावं. सिग्नल सोडून इतर ठिकाणी असलेल्या झेब्रावरुन जाताना वाहनाचा वेग कमी ठेवावा.
- बारीकसारीक कारणांसाठी 'गाडी'वरुन जाणाऱ्यांनी कधीतरी 'चालावे'. आरोग्यासाठी चांगले, पर्यावरणाला हानिकारक नाही आणि पादचाऱ्यांच्या समस्याही कळतील!
बसचा किंवा कारपूलचा वापर केल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी ठेवायला मदत होईल. - पादचारी सिग्नल असताना ट्रॅफीक पोलिसांनी पादचाऱ्यांना आवर्जून मदत करावी
- वाहतुक नियोजन खाते: एखाद्या रस्त्यावर उलट दिशेने होत असलेल्या वाह्तुकीची कारणे समजून घेवून हे होऊ नये यासाठी वाह्तुकीत आवश्यक फेरफार करावेत
- बिबवेवाडी रस्त्यावर किमान दोन ठिकाणी गरवारे पूलाप्रमाणे कमी पायऱ्या असलेले सबवे करावेत. असे सबवे जास्त परिणामकारक असतात हे सिद्ध झाले आहे.
- पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांसमवेत आपल्या भागात किमान ६ महिन्यातून एकदा पाहणी करावी
- मोहल्ला कमिटी/शेजार गटांनी आपल्या भागातील पथारीवाले/दुकानदार यांच्याशी बोलून पदपथ रिकामा ठेवण्याची विनंती करावी
- चालणाऱ्यांनी पदपथांवरुनच चालावे, झेब्रा वा दुभाजकामधल्या छेदावरुनच रस्ता ओलांडावा, तसेच चौकामधे पादचारी सिग्नल हिरवा असतानाच रस्ता ओलांडावा
- आर.टी.ओ.: वाहन परवाना देताना पादचारी सुरक्षा या विषयावर वाहनचालकांना प्रश्न विचारावे
वरील उपाय
अमलात येतीलही कदाचित. पण
आता पादचाऱ्यांनीच एकत्र
येवून आपले प्रश्न मार्गी
लावण्याची वेळ आली आहे.